Saturday, 15 April 2023

मोह,[madhuca longifolia],महुआ..

              मोह हा उष्ण व कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. मोहाची दारु बरी पण दारुचा मोह बरा नाही ..अस म्हणतात .मोहाच्या झाडांचे  भरपूर प्रमाण वाडा, शहापूर,..जव्हारच्या  जंगलात बघायला मिळतात..चैत्र सुरु झाला कि ह्या झाडांना सुंदर पिवळी..गर्दगुलाबी.. तपकिरी रंगाची पालवी येऊन ही झाड एखाद्या चित्रा सारखी दिसतात .गळून गेलेल्या झाडांच्या बोखांवर कळ्यांचे घोस आणि नविन इवल्या पानांनी हे झाड मोहरुन येते..लांबूनही ह्या झांडांच्या फुलांचा मादक वास आपल्याला ओढून आणतो ..ह्या झाडाखाली सकाळी गेलात तर  प्राजक्त्ताच्या सड्यासारखे  फुलांचे सडे पडलेले असतात..दिवसभर टुपुक टुपुक करत फुल पडतच असतात..फळे...मोहाची फुले(madhuca longifolia) ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवुन देतो. पाने..फुले ..बीया..जंगलातून जमा करुन बाजारपेठेत विकले जातात,.
           कळ्या फुलांनी लगडलेल हे झाड सुध्दा कल्पवृक्षापेक्षा कमी नाही .गळलेल्या  पानांचा उपयोग मशागती साठी होतो.. .तर हिरव्या पानांची पत्रावळ म्हणून उपयोग होतो..लग्न व सणांच्या दिवशी या पत्रावळी व द्रोणांना चांगली मागणी असते,.काही ग्रामीण भागात ही पत्रावळ मेलेल्या माणसांचे पिंड पाडताना ही आवश्यक मानली जाते..तसेच  मोहाच्या फुलांचा उपयोग ती एकत्र करुन कुजवून त्याची दारु किंवा वाईन बनवण्यासाठी होतो..काही ग्रामीण भागातील जुनी लोक ह्या दारुला औषधाच्या दृष्टिकोनातून बघतात ..फुलांचा वापरही काही रोगांवर वेगवेगळ्या पध्दतीने केला जातो...फुल गळून गेल्यावर त्याच गुच्छावर फळांचा गुच्छ  येतो..मार्च..ते जून  या कालावधीत  शेवटी शेवटी ही फळ पक्व होतात ..पक्षी अन्नाच्या शोधात ह्या झाडांवर गर्दी करतात ..वरचा पिकलेला भाग खावून उरलेल्या बीया झाडांखाली पडतात..ह्याच बीया ..पून्हा झाडे उगवण्याच काम करतात ...कच्च्या स्वरुपात काढलेल्या फळांची भाजी म्हणून उपयोग केला जातो..बीयांना मोहट्या अस संबोधल जात ..ह्याच्या तपकिरी रंगाच्या बीया फोडून आतील सफेद बीगर काढून सुकवून तेल गिरणीतून तेल गाळल जात.तेल  स्वयंपाकासाठी उत्कृष्ट दर्जाचे असत..ह्या तेलाचा स्वाद गोड असतो म्हणून चामटी ह्या गोड पूरी सारख्या पारंपारिक पदार्थाला तळण्याने त्याचा अधिक स्वाद वाढतो असा समज ग्रामिण भागात आहे..तेलाचा दिवा लावण्यासही उपयोग होतो.मोहाचे लाकुड जास्त टिकावू नसतं त्याचा इंधन म्हणून उपयोग होतो .तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात ती पेंढ जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते, तिचा खतासाठीही उपयोग होतो. मोहाच्या सालीपासून रंग तयार केला जातो.मोहाच्या सालीत टॅनिन असते. या सालींचा उपयोग रंगासाठी करतात.
                                                               नेत्रा...

No comments:

Post a Comment