Friday, 21 April 2023

लाॕकडाऊन कविता

फॕन  आणि माझ्यातलं 
 अंतर खूप मैलांवर गेलय

बंद दरवाजावर पोहचतात हाका 
आणि 
क्षणात लहानमुलांगत येतात 
 परत 
कुठे कधी कशी  जाऊ

            सवयच अगदी
           ट्रॕफिक रुल्स नको 
     पण जाग्यावर पोहचायचेच
.........................................................

गर्दी हवी आहे 
गुदमरुन टाकणारी
घामाचा,बुटांचा  ,राईच्या तेलाचा
वास आला तरी परवडेल
पण हा एकांतवास नको झालाय

       सार्वजनिक घाणेरड्या  मुतार्या
गलिच्छ लोकवस्ती
तुंबलेल्या गटारी
रस्त्यावरचे घाणीचे ढिग
              आठवायला लागलेत
माझी ओळख नाही कुणाशी
 गबाळी मी
  दुर्गम गावातली
                 कदाचित् 
न फिरकलेल्या  शहराच्या प्रेमात पडेन

नदी पाहाता यावी म्हणून 
डांबरी रस्त्यावर पूर शोधला
      शेत नाहीत म्हणून  
अख्खी कंपनी फिरले
कसल पीक येतय पाहत

सवंगडी शोधत 
सिमेंटच जंगल तुडवलं
 माणसं की जनावर राबत होती
वेळ नव्हता  बोलायला,बसायला
 ठरलं
आपले आणि शहराचे नाते पक्के.
............................................................

       जर कुणी विचारलं मला 
माणसाच दुःख काय   ग?
          दिवस रात्र  सांगत बसेन
पोटात ओरडणार्या कावळ्याची गोष्ट

               माकडासारखं परत जगाता येईल
 कदाचित् 
कांदे बटाटे कचाकचा खावून 
 डाळींचे बकांदे मारुन
पीठ चाटून खाऊन
बादलीतल पाणी घसाघसा पीऊन
स्वयंपाकाचा प्रश्न मिटलाही असता

          जीभेवरच्या संपल्या असत्या test buds 
तर
सिलेंडर  व भाज्या घ्यायची गर्दी मिटली असती

    भूक नसती तर

पशूपक्षांसारखी  स्थलांतर  जाग्यावर थांबली असती
          माणसं आरामात बसली असती
विचारांचे खापर फोडून

...................................................................

झोप तर कपड्याचा रंग उन्हात
उडावा तशीच 
अचानक गेली
दिवस रात्र तारखा यांचेच गणित 
      
       हाडातली flexibility संपायला आली

फ्रिज हळू हळू रिकामा झाला.
.पाण्याच्या भरल्या बाटल्यानेही 
भरल्यासारख वाटत
 घर
खायला उठत तरीही

उठता बसता   प्रश्न 
    माझी शाळा कधी सूरु होईल ग

मग मी युनिफाॕर्म ,रुमाल ,साॕक्स 
आणि टिफीनला काय देऊ 
विचारात डोकावते 
           
 
रिकाम्या खिशागत तोंड करुन
 दिवस भर सोफ्यावर पडून आॕफिसबॕग
गप्पा करते  टिव्हीत
          
           माझ्यातली मी थोडी गप्प होत जातेय 
आठवते ह्दयाच्या कोपऱ्यात
पहाटे ते मध्यरात्री  
जनावरागत धावणारं शहर

     पुन्हा  सगळं आवरून ठेवते
उद्या पासुन तीच नविन पहाट 
उजाडल्याची स्वप्न पाहत.
                        
                                                    ,,,,,  नेत्रा राऊत 

No comments:

Post a Comment